शिवजयंतीला रायगडला जायचं आमचा बेत
फसला, पण चैनच पडेना म्हणून मग कमीतकमी सिंहगडावर तरी जायचेच असे ठरवून घराबाहेर
पडलो. पण आमचे बेत सगळेच फिस्कटत गेले. गडाच्या पायथ्याला पोहोचल्यावर कळाले "काम चालू रस्ता बंद". मग काय "पावले चालती पंढरीची वाट" .
चालत जावून तानाजींना मुजरा घालायचा, सूर्यास्त बघायचा आणि लगेच परत फिरायचे असे ठरले.
आमच्या नेहमीच्या ग्रुप बरोबर आज एक नवीन मावळा आला होता , त्याच्या वजनामुळे त्याला ढकलत ढकलत गडावर न्यावा लागला. पण पोहोचलाच तो गडावर .
गडावर पोहोचेपर्यंत सूर्याने क्षितिजावरून कल्टी मारली होती. सूर्य मावळला होता पण अजून त्याच्याकडून क्षितिजावर विस्कटलेले रंग आवरायचे राहिलेच होते. आम्ही जमेल तेवढे रंग आमच्या कॅमेऱ्यात भरून घेतले. हे रंग तुमच्यासाठी ....
गडावर येताना "जय शिवाजी -जय भवानी" च्या घोषणा , ढोल-ताशांचा आवाज येत होता. आम्ही आज उशीराच आलो लवकर यायला हवे होते . गडावरून परत जाणाऱ्याच्या प्रत्येकाच्या कपाळावर गुलाल,कुंकू छान दिसत होते. बरेच जण कुर्ता -पायजमा, फेटे अशा पेहरावात होते. छानच वाटत होते.
नंतर तानाजींच्या पुतळ्याला कुर्निसात, त्याचबरोबर भगवा झेंडा आणि शिवाजी महारांजाच्या प्रतिमेला कुर्निसात घालून परतीची वाट धरली.
" सिंहगडावर जावून कांदाभजी नाही खाल्ली तर पाप लागते " म्हणे, म्हणून ७-८ प्लेट भजी ५ जणांनी खाल्लीच.
उतरायला सुरुवात केली तेवढ्यातच चंद्र उगवलाच.
मित्रांमध्ये वाद चालले होते- एक म्हणे फक्त सूर्यच उगवतो आणि मावळतो, चंद्र उगवत-मावळत नसतो , खरे खोटे काय ते चंद्र-सूर्यालाच माहित. एवढं मात्र नक्की आम्ही कशावरही वाद घालू शकतो .
चंद्र अप्रतिमच दिसत होता . त्याचे काही फोटोग्राफ्स ..
काही ठिकाणी आमच्यातला फोटोग्राफर जागा होतो
आणि मग मागे राहिलो की बाकीच्या लोकांच्या आम्ही
शिव्या खातो . चालायचेच.
कोणाकडे battery नव्हतीच, नशीब पोर्णिमा नुकतीच
होऊन गेली होती, त्यामुळे चंद्र पूर्ण जोषात होता.
गडावर अगोदरच आम्ही वाद घातला होता -पोर्णिमा झाली की अमावस्या चंद्र उगवल्यामुळे ह्या वादावर पडदा (उजेड?) पडला.
चंद्राच्या कृपेमुळे अडखळत- धडपडत का होईना पण शेवटी दहा-साडेदहाला पायथ्याला पोहोचलो. मग गाड्या घेऊन डायरेक्ट पुणे ...
---BinaryBandya™