बुधवार, २१ जुलै, २०१०

राजगड

२-३ वेळा राजगड ला जाऊनही बालेकिल्याला भेट द्यायचे राहिलेच होते. कधी सुवेळा माची कधी संजीवनी माची पण बालेकिल्ला मात्र प्रत्येकवेळी चकमाच देत होता . एकदा तर आमच्या पैकी फार शेवाळ होते म्हणून परत आलो होतो. ह्यावेळी मात्र फक्त बालेकिल्लाच सर करायचा एवढेच ठरवून राजगड चढायला सुरुवात केली होती .

नेहमीच ट्रेक ठरवण्यासाठी आम्ही सगळे mail mail खेळतो .15-20 mail नंतर माहित नसलेल्या , जाऊन आलेल्या सगळ्या गडांची नावांचा काथ्याकुट झाल्यावर कुठे राजगड बालेकिल्ला final झाला होता ...

नेहमीप्र

माणे सकाळी ६ चा प्लान होता पण पण ..आमच्या मावळ्यांची साखर झोप मीच मोडली. कुणी आंघोळ केलीच नाही फक्त तुळसच लावून आले . एक एक cutting चहा मारला आन पकडला रस्ता राजगडचा वडगाव जवळ अजून एक मावळा योगेश्वर आम्हाला जॉईन झाला. (त्याला आम्ही फील मास्तर म्हणतो, प्रत्येक गोष्टीत ह्याला फीलाच आला पाहिजे मग तो चहा असुदे , जेवण असुदे वा अगदी तुळस लावायची असेल तरीही फील महत्वाचा ... )

वातावरण एकदम पावसाळी अजिबात नव्हते , पावसाळा अन उन्हाळा ह्यांच्या मधेच असल्यासारखे .
उन्हाळा जायला तयार नाही अन पावसाळ्याला कधी येतोय असे झालेय असे काहीतरी.आम्ही मनोमन प्रार्थना करत होतो की पाउस यावा . कात्रज घाटानंतर थोडीशी पेटपूजा केली. राजगडावर खाण्याची सोय नसल्याने एकतर जेवण सोबत घेऊन जावे किंवा खालीच भरपूर खाऊन घ्यावे. कारण चढताना देखील रस्त्यात लिंबू सरबत, ताक असे काही मिळत नाही.त्यामुळे आम्ही २-२ पोहे आणि चहा कॉफी घेतलं. ताजं तवानं होऊन मग आम्ही नसरापूर च्या दिशेने मार्गस्थ झालो. तिथे केळी, लिंबू (सरबतासाठी) आणि पाणी घेऊन पुढे निघालो.

जाताना पूर्ण रस्त्यात राजगडाच दर्शनच झालं नाही. उंच उंच जाऊन ढगांच्या कुशीत तो गाढ झोपला होता. आणि तिकडूनच आमची गम्मत पण बघत होता.पूर्ण रस्त्यात जाताना जुन्या ट्रीप आठवत होत्या. सगळ्या ट्रीप मध्ये काढलेले, ते सगळे जुने स्पॉट आठवत होते. पण या वेळेस इरादा पक्का होता. बालेकिल्ला सर करायचाच. त्यामुळे कुठेही न थांबता आम्ही सरळ राजगडाच्या पायथ्याला पोहोचलो.

उन आता हळू हळू तापायला लागल होतं. म्हणून लगेच चढायला सुरुवात केली. पण ५ मिनिटातच रस्त्यात जांभळाची झाडे दिसली. मग काय, आधी पोटोबा या नियमानुसार मनसोक्तपणे जांभूळ खायचे असा ठरलं.
पण सगळं इतका सोप्पं नसत. जीन्स च्या pant घातलेल्या असल्यामुळे कोणालाच वर चढता येईना. मी तर अभ्याच्या खांद्यावर उभा राहून जांभूळ तोडायचा प्रयत्न केला. पण अफसोस. शेवटी गपचूप खाली पडलेले जांभूळ खाल्ले आणि लगेच निघालो. (कदाचित राजगड पण आमची वाट बघत असावा म्हणूनच आम्हाला लगेच निघावं लागल.)
राजगड चा रस्ता उन्हाळ्यात फारच भकास वाटतो. कारण आजूबाजूला झाडी तशी कमी आहे. आणि शेत जास्त आहेत. त्यामुळे सगळेच ओसाड दिसते. पण पावसाळ्यात हेच दृश्य एकदम वेगळेच असते. सगळी झाडे हिरवीगार झालेली असतात. शेत हिरवे असते. डोंगर हिरवा झालेला असतो. जरी उन्हाळा असला तरी थोडा गड चढून गेल्यावर जो गार वारा येतो त्याची मजा काही वेगळीच आहे. या वेळेस ध्येय्य ठरलेला असल्यामुळे रस्त्यात थांबे पण कमी घेतले. पण एक गोष्ट मात्र बदलली नव्हती. ती म्हणजे आमचे फोटो. (अभ्या चा कॅमेरा सोम्याने पळवला होता. त्यामुळे मोबाईल च्या कॅमेऱ्याने फोटो काढत होतो.) थोडे कमी काढले पण काढले.
सगळ्यांचाच राजगड २ वेळा झाला होता त्यामुळे रस्ता लगेच लक्षात येत होता.

२ तासात आम्ही राजगडाच्या मंदिराजवळ पोहोचलो. तिथे एक पाण्याच टाकं आहे. तिथे पाणी थंड असते. पण या वेळेस आम्ही गेलो तेव्हा टाक्याची अवस्था फारच दयनीय होती. आजींना पाण्यासाठी विचारले असता, "तळ्यातालेच पाणी प्या." असे सांगितले. तळ्यापाशी गेलो तर पाण्याचा रंग पाहून सगळ्यांच्या तोंडाचा रंगच उडाला. पण ईलाज नव्हता. सोबत असलेल पाणी रस्त्यात कुठे उडून गेल कळल पण नाही. आणि रूम वरून जोशमध्ये निघताना भरून ठेवलेल्या बाटल्या आम्ही रूमवरच विसरून आलो होतो. हे पण आम्हाला गडावर गेल्यावर आठवल कि 'आपण बाटल्या भरून ठेवल्या होत्या'.
तिथे मग जेवायची order देऊन आम्ही मंदिराच्या मागच्या भिंतीवरून तोरणा बघत होतो. तोरणा काही आम्हाला नवीन नव्हता. किंवा त्याचा रस्ता पण नवीन नव्हता. पण नवीन होता ते बघण्याच साधन. या वेळेस सोबत योग्याने हरिश्चंद्र गडावर जाताना जी दुर्बीण विकत घेतली होती ती सोबत होती. सिंहगड, तोरणा, आजूबाजूचा परिसर सगळा बघण्यात १ तास निघून गेला.थोड्या वेळाने आजींनी पिठलं, भाकरी, कांदा आणि चटणी आणून दिली. सकाळचे २ प्लेट पोहे तर किती पुरणार? सगळे जन २ दिवस भुकेले असल्यासारखे त्या ८ भाकारयांवर तुटून पडले. पण खरा प्रश्न होता पाण्याचा. प्यायचं काय? पण पर्याय नव्हता. मग तेच तळ्यातल शेवाळयुक्त हिरवागार पाणी नाक आणि डोळे बंद करून पोटात टाकल.बालेकिल्ला आणि पदामावती माची..


सगळे मावळे परत पुढे जायला तयार झाले. पण सगळे एकत्र आहेत आणि वात न चुकता जातील असा शक्य आहे का?? संजीवनी माचीच्या रस्त्यावरून जात असताना कळल कि बालेकिल्ल्याची वाट वरून जात होती.
पण माघारी जाऊन वर चढण्याचा मूड नव्हता. मग की तिथूनच वर चढायला सुरुवात केली.५०-१०० फुट वर चढलो असेल फक्त, पण आमच्या ढाण्या वाघासाहित सगळेच धापा टाकत होते. (ढेर्या वाढल्यात दुसरं काही नाही)
पण आम्ही इतका वर आलो म्हणून कि काय गड पण आमच्यावर खुश होता. तिथेच एका ठिकाणी दगडातून थेंब थेंब पाणी झिरपत होते. तिथे मनसोक्त पाणी पिऊन बाटलीत भरून घेतले. पाण्याची किंमत कळली तिथे आम्हाला.

मागे सिंहगडावर पाऊस तर जणू त्याला मोठ्या शोवर खाली आंघोळ घालत असल्यासारखा बरसत होतं. पुढच्या १० मिनिटात आम्ही बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर उभे होतो. शब्दात वर्णन करण्यापेक्षा तो दरवाजा तिथे जाऊनच बघावा. तिथे थोडा वेळ विश्रांती घेऊन, मंदिरात दर्शन घेऊन बालेकिल्ल्याच्या बुरुजाजवळ गेलो.तिथे वारा तर 'मी' म्हणत होतं. जणू वादळी वाराच. महाल बघून, थोडे orkut पोस फोटो काढले. तुथून 'रोहीडा' आणि 'रायरेश्वर' चे पठार दुर्बिणीतून पाहता येते.परतीच्या वाटेवर मुख्य दाराजवळ पक्ष्यांचे आवाज ऐकत बसलो. मधेच काही माकडांचे पण आवाज आले आणि आमचा १ मिनिट वाया गेला. आता थोडे ढग जमा झाले होते. आणि बारीक पाउस पण येत होतं. साधारण ५ वाजता उतरायला सुरुवात केली. रस्त्यात एका घरात चहा आणि बिस्कीट घेतले. ७ वाजता पुन्हा गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. हात पाय धुवून, स्वच्छ पाणी पिऊन आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालो.

---सुरेश

सोमवार, २१ जून, २०१०

रतनगड

बरेच दिवस मेल मेल खेळून झाल्यावर सगळ्या KPS मेम्बर नी ट्रीप ठरवली. सगळ्यांना विचारून दिवस ठरवण्यात आला. आणि सगळे परत जोश मध्ये आले. 'रतनगड' आम्ही सर करणार होतो.
पण झालं नेहमीसारखाच... नेमकी आदल्या दिवशी १-१ करून बरेच मेंबर गळाले. आम्ही ४ च (सारंग, संदीप, अभिजीत आणि सुरेश) जण उरलो जाणारे. पण जायचं ठरवलं म्हटल्यावर मागे थोडेच हटणार होता.. आम्ही चौघांनी ठरलेल्या दिवशीच जायचं ठरवलं.

शुक्रवार रात्री आम्ही माझ्या
(सारंग) घरी पोहोचलो. नुकताच वादळी पाऊस झालं होत म्हणून वातावरण थंड होते, आणि रस्त्यात भरपूर चिखल होता. म्हणून कुत्री पण मागे लागली नाहीत.घरी जाऊन मस्त पैकी आईच्या हातच जेवण जेऊन झोपलो.सकाळी ५ ला जायचं ठरवलं होत. (जे आम्ही नेहमी ठरवतो आणि नेहमी योगेश्वर येऊन आम्हाला ६ वाजता उठवतो.) पण या वेळेस योगेश्वर नव्हता उठवायला म्हणून कि काय कोण जाणे सगळे लवकर उठले.

भावाची alto घेऊन आम्ही भंडारदरा ला निघालो. गाडीत cd player होता, आणि नेहमीप्रमाणे आमच्याकडे त्यात ऐकायला काहीच नव्हत. पण त्याची गरजही पडली नाही. टाईम पास करत आम्ही भंडारदराला पोहोचलो. ट्रेक मोठा आणि थोडा थकवणारा आहे असे ऐकून होतो. म्हणून रंधा धबधबा न बघतच पुढे गेलो. जंगलात वाट चुकायला होते असेही मित्रांकडून कळले होते. म्हणून भंडारदरात गाईड शोधला.
"४ लोकांचे ४०० रुपये होतील. संध्याकाळी लवकर परत याव लागेल. गाडीची सोय तुम्ही बघा." आणि असे बरेच नाटक गाईड करत होता. शेवटी त्याचा शहाणपणा ठीकाण्यावर आणत त्याला २०० रुपयात शांत केला. नाष्टा करून आम्ही निघालो.डोंगर दर्याच्या रस्त्याने वार्याच्या वेगाने (alto च्या हिशोबाने वार्याचा वेग) साधारण २०-२५ मिनिटात रतनवाडी ला पोहोचलो.

रतनवाडी ला शंकराचे छान मंदिर आहे. पांडवा
नी एका रात्रीत हे मंदिर बांधले अशी
आख्यायिका आहे. अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या या मंदिराची शासनाच्या architecture खात्यात नोंद आहे. मंदिराच्या आतून व बाहेरून कोरीव काम केलेले आहे. भंडारदरा धरण पूर्ण भरते तेव्हा या मंदिरातील शंकराची पिंड पूर्णतः पाण्याखाली जाते असे इथले गावकरी सांगतात. देवदर्शन करून लगेच गडाकडे कूच केले. (साधारण ९.३० वाजले असावेत)


सुंदर अमृतेश्वर मंदिरसुरुवातीला साधारण अर्धा पाउण किलोमीटर अंतर नदीकीनारून चालत पुढे गेल्यावर खरी चढण सुरु होते. ६-७ वेळा नदी पार करावी लागते. मी आणि गाईड सोडून बाकी तिघांनी बूट घातले होते. त्यामुळे १-२ दा त्यांची पंचाईत झाली. नदीतून त्यांनी कधी माकड उड्या मा
रत तर कधी बूट काढून नदी ओलांडली. नदीलाही पायाच घोटा बुडेल इतकेच पाणी असल्याने तसा काही फारसा त्रास झाला नाही.


कोणताही गड असो, कोणाचाही उत्साह क
मी होत नाही. (कधीतरीच थकवा आल्याने थोडे थांबावे लागते, पण गड सर केल्याशिवाय कोणीच परतीची भाषा करत नाही.) त्या उत्साहात आम्ही डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. समोर घनदाट जंगल, आणि माथ्यावर गड."हर हर महादेव!" चा जल्लोष (फक्त ५ लोक असल्याने जल्लोष तसा काही जंगल हादरवणारा नव्हता पण सगळ्यांच्या मनापासून होता) करून आम्ही चढायला सुरुवात केली.

आणि हा ढगात हरवलेला रतनगड...


आमचा गाईड सुरुवातीला आम्हाला म्हणाला कि तो रतनगड ला ब
र्याच वेळा गेला आहे. रस्त्यात जाताना तो म्हणाला कि ३ दाच गेला आहे. आणि पायथ्याला आल्यावर तर त्याने फार मोठा शॉक दिला. "तसा मी २ दा आलो आहे पण शेवटच येऊन मला बरेच महिने झाले. त्यामुळे मला नेमका रस्ता आठवत नाहीये."हे ऐकून आम्ही गारच पडलो. पण गड सर केल्याशिवाय परतायचं नाही हे ठरवलंच होत. त्यामुळे विचार केला जस जमेल तस वर जाऊ. जे होईल ते बघून घेऊ.
ट्रीपला जाताना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फोटो. (त्यासाठी मी भंडारदरा मध्ये दाढी केली होती :P) पण गड चढायला आणि उतरायला वेळ लागतो आणि त्यात आमचा गाईड अतिशय हुशार, म्हणून फोटो काढण्यात फार वेळ न घालवता आम्ही चढत राहिलो.

सुरुवातीला सगळ ठीक होता, पण जंगल सुरु झाल्यावर खरी मजा आली.चढामुळे थकवा जाणवायला लागला होता. आणि वारा पण जणू लपाछपी खेळण्याच्या मूड मध्ये होता. कुठे दडून बसला देव जाणे. वारा दिसत तर नाही, पण आता कणभरही जाणवत नव्हता. झाडाझुडपातून, तुटलेल्या फांद्यांवरून, वाहत्या पाण्याच्या वाटेतून रस्ता काढत काढत आम्ही वर चढत होतो. प्रत्येक वळणावर 'हाच का रस्ता कि चुकतोय?' असा प्रश्न मनात यायचा. तसा आमचा गाईड उत्साही फार हो
ता. माहित नसल तरी पूर्ण विश्वासाने आम्हाला घेऊन चालला होता. रस्तात भरपूर गोष्टी फेकतही होता. आणि त्यावरच वाद विवाद करत आम्ही निम्मा गड चढून गेलो.

थोडा जंगलातून बाहेर आल्यासारख वाटल. थोडा मोकळ वातावरण होत. तिथे २ रस्ते होते. आणि आमच्या गाईड च्या भरोश्यावर आम्ही डावीकडे जाण्याऐवजी उजवीकडे गेलो. आणि परत जंगलातला चढ सुरु झाला.
बराच वेळ झाला तरी गदा येण्याची चिन्हे काही दिसेना. कदाचित रस्ता चुकला. डावीकडे जायला हव होत. आणि सगळ्यांच्या पोटात गोळा आला. मग आता काय? पण आमचा गाईड ऐकेचना. "अरे चला तुम्ही आपण आहोत बरोबर रस्त्यावर." दुसरा पर्याय पण नव्हता. आम्ही चढत राहिलो. आणि शेवटी आम्हाला गडावर जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. "हर हर महादेव" चा अजून एक गजर झाला. आणि सगळ्यांचा उत्साह पुन्हा एकदा top गेअर मध्ये आला.

डुगडुगणारी शिडी, ९० अंशामध्ये हलणारा कठडा, अरुंद पायऱ्या कशाची परवा न करता आम्ही वर चढलो.
खरच फार आनंद झाला ज्या वेळी आम्ही किल्ल्याच्या दारात उभं राहून फोटो काढला. जाड असल्यामुळे अभ्या आणि संद्या दाराच्या समोर असलेल्या बारीक जागेत फसले. (तरी सांगत होतो वाढलेल्या ढेर्या कमी करा.) पण आडव तिडवा करून कसेतरी वर चढले. मी, सुऱ्या आणि गाईड बारीक असल्याने पटकन चढून गेलो.
तिथे वर देवीच दर्शन घेतलं. थोडा वेळ आराम केला आणि गड बघायला निघालो.


गडावरून दिसणारे भंडारदरा धरणतसे गडावर बघण्यासारखी ठिकाणे कमी आहेत. २ गुहा आहेत, देवीचे मंदिर आहेत, दरवाज्याचे काही अवशेष आहेत, आणि काही पाण्याची तळी आहेत. आम्ही दारातून आत गेल्यावर तसेच सरळ जात राहिलो. तिथे पाण्याच एक छोटासा टाकं होत. त्यावर उभे राहिलो आणि काहीतरी वेगळच वाटल. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडला.


जिथे ह्रदयाची धडधड थांबते,
डोळ्यांची उघडझाप बंद होते,
कितीही डोळ्यात साठवले तरी मन भरत नाही,
जिथुन काहीही केले तरीही पाय निघतच नाही...

जिथे कॅमेरे मी मी करत पुढे सरसावतात,
अन जिथे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात...

...कातराबाई कडासमोरच्या डोंगराकडे फक्त बघत राहिलो.त्या 'कात्राबाई कड्याच' शब्दात वर्णन कारण अशक्य आहे. समोरचा उंच डोंगर आणि त्याला वार्याने पडलेले कडे यांचा वर्णन करण्यापेक्षा ते स्वतःच्या डोळ्यांनी बघणेच चांगले.सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. तिथे बराच वेळ बसल्यावर गडावर असलेल्या एका छोट्याश्या टेकडीवर जायचं ठरलं. म्हणून तिकडे निघालो. वाटेत अजून एक मोठ्ठ पाण्याचं टाकं होत. एकदम स्वच्छ आणि नितळ पाणी होत. मग आम्ही तिथे बसून भेळ खाल्ली. (सगळ्या पिशव्या आणि कागद परत आमच्या bag मध्ये ठेवले)
मग तिथे थोडा वेळ टाईम पास केला. फोटो काढले. आणि जरा वेळ आराम केला. (कारण मनानी जरी आम्ही ताजेतवाने होतो तरी पाय थोडेसे थकलेले होते.)

मग तिथून परत निघालो तर टेकडी वर जायचं कि परत कात्राबाई कडा बघायचा वियर ५ सेकंद विचार केला आणि आम्ही कात्राबाई कड्याकडे निघालो. (दुसरा कारण होत कि अभ्या त्याचा चष्मा कड्यावर विसरून आला होत.)
खरतर टेकडी पेक्षा कात्राबाई कडा आकर्षक होत. असा वाटत होत की तो सारखा सारखा आम्हाला बोलावत होत.
आमचा कंपू पुन्हा कात्राबाई कड्यावर. तिथे बराच वेळ नुसते बसून होतो पण कुणालाही परत जायची इच्छा होत नव्हती. तो कडा, ढग, सूर्य आणि मोकळा निसर्ग.

पण परतण भाग होत. म्हणून आम्ही निघालो. गड उतरायला सुरुवात केली तेव्हापासूनच जरा ढग दाटून येत होते. वादळी पाउस येण्याची शक्यता होती. म्हणून आम्ही लवकर निघालो. पण काही उपयोग नव्हता. पाउस फारच जोरात आला आणि आम्ही नख-शिखांत भिजलो. येताना परत गाईड ने काहीतरी फेकायला सुरुवात केली आणि आम्ही सगळे मिळून त्याची घेत होतो. काही वळणांवर तर तो स्वतःच चुकत होता. पण आमच्याकडच्या दिशा expert (अभ्या) मुळे आम्ही बरोबर रस्त्याने परतत होतो.आम्ही ४ तर मजेत होतो पण आमचा गाईड जरा बिचकला होत. एकतर त्याला जबरदस्त थंडी भरली होत आणि दुसरा कारण आम्हाला नंतर कळल. १.५-२ तासात आम्ही खाली आलो. मस्त पाउस होत, धबधबे पण सुरु होते रस्त्यात. फार छान वाटत होता. आणि आमचा गाईड घाई करत होता. पण म्हटलं जाऊदे. आणि त्याच्या घाईच कारण आम्हाला थोड्याच वेळात कळल. जेव्हा आम्ही नदीपाशी आलो, आम्ही शांतच झालो. (अक्षरशः शांत झालो) अंगावर मोठ्ठा कट उभा राहिला. कारण १५ फुट नदीच पात्र पण पाण्याचा जोर बघून आमची हिम्मतच होईना.

जाताना घोटभर असलेला पाणी आता तासाभरात कमरेपर्यंत आला होत. पाण्याला जोर आला होता."असेल हिम्मत तर जाऊन दाखवा." असा challange जणू ती नदी देत होती. गाईड ने तर जायला मनाच केला. पण तिथे जंगलात थांबण हि शक्य नव्हत. मी आणि गाईड फक्त दोघांनाच पोहता येत नव्हत. म्हणून मग साखळी करून पाण्यात घुसलो. पडत, सावरत एकमेकांना धरून आम्ही नदी ओलांडली. आणि हि कसरत परत ३ दा करायची होती. बाजूच्या डोंगरावरून येणाऱ्या धबधब्याचा जोरामुळे १-२ ठिकाणी दरड पडल्या होत्या. ३ र्यांदा नदी ओलांडताना तर पाणी गळ्यापर्यंत आलं होत. पण शेवटी आम्ही नदी सुखरूप पणे ओलांडली. मग सगळे परत नॉर्मल झाले. परत गाईद्ने फेकायला सुरुवात केली आणि आम्ही त्याची घ्यायला. अभिजीत आणि त्याची तर पोहण्याची शर्यत लागली. पण आमच्या हट्टापायी तो प्लान cancel झाला. गाडीपाशी आलो तोपर्यंत आम्हा साग्ल्यानापण थोडीशी थंडी भरली होती. कपडे बदलून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

रस्त्यात पावसाने पुन्हा जोर पकडला. (तेव्हा मी कोणाला सांगितला नाही पण गाडी चालवताना मला जराही रस्ता दिसत नव्हता. ९०% रस्ता अंदाजाने गाडी चालवली.) पण मध्ये मध्ये जेव्हा थोडा पाउस कमी व्हायचा आणि आकाश मोकळ व्हायचं, तो निसर्ग फक्त बघत रहाव असा वाटायचं.

५.३० पर्यंत भंडारदरा ला परत पोहोचलो. गाईड ला गावात आणि संदीप ला कासाराच्या बस मध्ये बसवून आम्ही राहात्याला निघालो. जोरदार पाउस आणि वारा पूर्ण रस्ताभर सोबत होता. ८ वाजता साधारण घरी पोहोचलो.
जेवण करून रात्रीच बस पकडून सकाळी सकाळी पुण्यात परत पोहोचलो.

KPS ने सर केलेल्या गडांच्या यादीत अजून एक नाव जोडलं गेलं होत 'रतनगड'
खरच एकदा जरूर जावा असा गड. वर जाऊन जरूर पाहावा असा 'कात्राबाई कडा'. आणि प्रेमात पडावं असा निसर्ग...


---सारंग