सोमवार, १८ जुलै, २०११

पिंपरी तलाव - ताम्हिणी घाट


देवाने पृथ्वीवर काही ठिकाणी स्वर्ग निर्माण करून ठेवला आहे त्यापैकीच एक ताम्हिणी .
ताम्हिणी घाटात कितीही वेळा गेले तर मनच भरत नाही.
ताम्हिणी घाटात  कुठल्याही ऋतूमध्ये जा त्याची सुंदरता जराही कमी होत नाही.
पण हो पावसाळ्यात ताम्हीणीचे सौंदर्य जरा नाही फारच जास्त खुलते.
ताम्हिणी घाट परिसरात अजून एक सुंदर ठिकाण आहे - पिंपरी व्ह्याली आणि पिंपरी तलाव .



जरा कमी गर्दीचे आणि सुंदर असे ठिकाण. लहान मोठे  धबधबे, भरपूर झाडी , धुक्यात हरवलेले डोंगर अन रस्ते . आणि गडबड गोंधळ नसलेला शांत परिसर. अतिशय सुंदर .



स्वर्गाचे प्रवेशद्वार

ताम्हिणी गाव ओलांडले की ३-४ किमी वर उजव्या हाताला लोणावळा फाटा लागतो.
फाट्यावरून उजवीकडे वळला की धुक्यात हरवत चाललेला एक लहानसा डांबरी रस्ता तुमची स्वागत करतो. नंतर हाच रस्ता धुक्याबरोबर झाडीतही वळणे घेत हरवत जातो. हा रस्ता किती सुंदर आहे म्हणून सांगू , स्वर्गाचे प्रवेशद्वार म्हटल्यावर त्याने सुंदर असायलाच हवे, नाही का ?







रस्त्यावर मधेच दिसतो एखादा गुराखी धुक्यातून वाट काढत चाललेला. तो आमच्या सारख्या हौशी छायाचित्रकारांसाठी अल्बममधे जपता येईल असा एक सुंदर फोटो देऊन जातो.











फाट्यापासून  फक्त २ किमी आहे पिंपरी. पिंपरीच्या अगोदरच रस्त्यात डाव्या हाताला लागेल एक सुंदर दरी. ह्या दरीतून कोकणातून घाटावर येणारे ढग वर येतात. अतिशय सुंदर नजरा असतो - जिकडे लक्ष जाईल तिकडे हिरवाईने नटलेले डोंगर, डोंगराभोवती घुटमळणारे ढग आणि डोंगरांच्या अंगा-खांद्यावरून कोसळणारे धबधबे.








कितीही फोटो काढा मन भरणारच नाही ...
मधेच येणारा जोरदार पाउस अगदी चिंब करून जातो - शरीर आणि मनही. गेली ५-६ वर्षे इकडे येतोय. येताना ठरवतो की जास्त वेळ इथे थांबायचे नाही पण इथे आले की पायच निघत नाही. दहा- बारा सुंदर फोटो घेऊ आणि परत निघू असे काहीतरी ठरवलेले असते पण त्या दहा-बारा फोटोंचे शंभर फोटो कधी होतात ते पण कळत नाही.

  





इथून निघून जरा पुढे गेला की लागतो एक सुंदर तलाव. लहान आहे तलाव त्यामुळे लगेच भरतो आणि त्याच्या भिंतीवरून पाणी खाली वाहायला लागते. फार सुंदर नजरा असतो. इथे भुट्टा,भेळ,भजी असलं  काहीही मिळत नाही. एकदम स्वच्छ आणि सुंदर परिसर.




   हे झाड तर कुठलाही ऋतू असुद्या कधीच बहरत नाही, मला तरी कधी तसे दिसले नाही.
पावसाळ्यात पण हा सजत नाही की काय ? कदाचित बिचाऱ्याचे सजणेच आपल्याला समजत नसावे...
  








 काही छायाचित्रे:
 खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकत इथे मी तासन-तास बसून राहू शकतो.
 

हाच तो तलाव आहे की नाही सुंदर !!!  
भिरा


उपयुक्त माहिती:

रस्ते:
*  पुणे-पौड-मुळशी-ताम्हिणी-पिंपरी 
*  ह्याच रस्त्याने पुढे लोणावळ्याला जाता येते (पिंपरी - भांबर्डे - कोराईगड -लोणावळा )


आसपासचा परिसर:
* ताम्हिणी(६ किमी), कैलासगड, घनगड, तैलबैला   


---BinaryBandya™  



मंगळवार, १२ जुलै, २०११

कळसुबाई

ह्या पावसाळ्यातला पहिला ट्रेक कुठला करायचा असा प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार होते - कळसुबाई पुण्याहून अंदाजे २०० किमी. आणि भंडारदरा धरणापासून ६किमी. भंडारदरावरून बारी (कळसुबाईच्या पायथ्याचे गाव) फक्त ६ किलोमीटर आहे.
धुक्यात हरवलेले कळसुबाईचे शिखर 
रंधा धबधबा


रस्त्यात भंडारदरा रस्त्यावरच उजव्या हाताला  रंधा धबधबा आहे. अतिशय सुंदर असा हा धबधबा एकदा तरी बघावाच. धबधबा ज्या घळीत उतरतो ती घळई (प्रवरा नदी )सुद्धा छान दिसते.  आख्खं बालपण गेलंय ह्या नदीच्या काठावर त्यामुळे जरा जास्तच प्रेम आहे ह्या नदीबद्दल .











ही शिडी डायरेक्ट स्वर्गात जाते ..

शेंडी गावात(भंडारदरा) जरा नाश्ता केला  आणि तिथून थेट कळसुबाई गाठले .
 बारी गावात कळसुबाई मंदिराजवळ गाडी लावण्याची सोय आहे . तिथूनच होते ट्रेकला सुरुवात :)

तसा ट्रेक काही अवघड नाहीये कारण जिथे जिथे अवघड रस्ता आहे तिथे तिथे लोखंडी शिड्या आहेत. अगदी ५०-५० फुट उंच शिड्या देखील आहेत.

 






आम्ही चढाईला सुरुवात केली पण धुक्यात हरवलेले कळसुबाईचे शिखर काही दिसतच नव्हते. त्यामुळे किती चढावे लागणार ह्याचा काहीच अंदाज येत नव्हता. तास दीड तास चढून गेल्यावर कळसुबाईला असलेली ढगांची मिठी सुटली आणि शिखराचे दर्शन झाले. हो महाराष्ट्रातले सगळ्यात उंच शिखर.


कळसुबाई


 काय सांगू तिथे गेल्यावर काय काय मनात येते .

सुंदर अतिशय सुंदर ..
अतिशय जोरात वाहणारा वारा ,
वाऱ्याबरोबर पळणारे काळे-पांढरे ढग,
ढगांच्या मिठीत अडकलेले डोंगर,
डोंगराच्या अंगाखांद्यावर झुलणारी हिरवी झाडे
आणि ह्या अशा निसर्गाच्या प्रेमात पडलेले आम्ही सारेजण ...







शिखरावर लहानसे देवीचे मंदिर आहे भगव्या रंगात रंगवलेले.
मंदिरासमोर आहे एक लोखंडी गज त्याला अडकवल्यात बऱ्याचश्या लहानमोठ्या घंटा, रंगबेरंगी कापडाचे तुकडे आणि एक-दोन  त्रिशूळ.  त्यातली गूढता मनाला अशी काही खेचत होती की त्याकडे कितीही वेळ बघितले तरी मन भरतच नव्हते.













मध्येच येणारी पावसाची सर बापरे!!! अक्षरशः सुया टोचल्यासारखे पावसाचे थेंब लागत होते. पण जर असा ट्रेक असेल तर कसलाही पाउस मंजूर.


 काही छायाचित्रे ..
भंडारदरा धरणाची भिंत 






उपयुक्त माहिती:

रस्ते:
*  पुणे-संगमनेर -अकोले - भंडारदरा - बारी - कळसुबाई


आसपासचा परिसर:
* भंडारदरा (६ किमी), रतनगड - अमृतेश्वर मंदिर (अंदाजे २५ किमी), रंधा धबधबा (१० किमी)
* अलंग- मदन- कुलंग , सांधण


---BinaryBandya™