सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

कैलासगड

कैलासगड - Kailasgad
कैलासगडावर जायचा याअगोदर एकदा प्रयत्न केला होता पण अर्ध्यातूनच परत यावे लागले होते.  ह्यावेळी मात्र गडावर पोहचायाचेच असा चंग बांधूनच पुण्यावरून मी ,आदित्य, चेतन आणि योगेश निघालो होतो.
            
 
 
        मागच्यावेळी उशिरा निघालो होतो आणि त्यामुळे अर्ध्यातूनच परत यावे लागले होते . ह्यावेळी मात्र पहाटे-पहाटे ६.३० लाच  निघालो :). गड मुळशी धरणाच्या पसाऱ्याच्या मधोमध आहे. त्यामुळे बरेच फिरून जावे लागते . पुण्यावरून मुळशी - ताम्हिणी आणि परत लोणावळा रस्त्यावरून आत वाघवाडीला यावे लागते.तिथूनच ट्रेकला सुरुवात होते.


        दोन तासातच मुळशी - ताम्हिणी मागे पडले होते. सकाळी सकाळी माणसांची-गाड्यांची वर्दळ कमी होती.  निर्जन रस्ते नेहमीपेक्षा जरा वेगळेच दिसतात.  ताम्हीणीला वळसा घालून आम्ही वाघवाडीच्या रस्त्यावर आलो. 
 
 
 
 
 
 
 
 
 
खळखळती धावपळ
रस्त्यात वडुस्ते आणि वांद्रे हि लहान लहान गावे आहेत.  मधे एक दोन लहान मोठ्या ओढ्यांची धरणाकडे पोहोचायची खळखळती धावपळ चालली होती. हिरव्या रंगात सुद्धा किती छटा असू शकतात हे पहायचे असेल तर एकदा कैलासगडावर जायलाच हवे.
 
 
 
 
 
 
 
हिरव्या छटा
 
 
दहाच्या दरम्यान वाघवाडीत पोहोचलो,  गाडी लावली आणि सुरुवात केली खायला!! भूकच जरा जास्तच लागली होती. सकाळपासून फक्त चहाच होता पोटात. ब्रेड-जाम/भेळ खाल्ली आणि सुरुवात केली गड चढायला.
              
       १५ मिनिटेही झाली नाहीत तोवरच वाट झाडीत हरवून गेली. पण मागच्या वेळच्या अनुभवामुळे अर्धा रस्ता तरी माहित होता.  अक्षरशः झाडीतून वाकून वाकूनच जावे लागते. ३-४ फुटावरचा माणूसही दिसणार नाही अशी झाडी.
 
 
 
 
          पहिलीच टेकडी चढली की असा काही नजरा दिसतो की एवढ्या दूर आल्याचे सार्थक झाले असेच वाटते.  मुळशी धरणाच्या पाण्याने वेढलेले डोंगर आणि समोर दिसणारा कैलासगड.
सगळीकडे नजर जाईल तिकडे एकतर निळेशार पाणी नाहीतर हिरवाईने नटलेल्या टेकड्या अन डोंगर .
रस्त्यात मधे मधे १-२ लहान-सहान धबधबेही येतात. 
 

    ह्यावेळी आमच्याबरोबर होता चेतन. तो त्याच्या blackberry वरून facebook वर फोटो अपलोड करत होता, अगदी काढल्या काढल्या. त्याला येणारे likes , कमेंट्स वाचत वाचत आमचा ट्रेक सुरु होता. चौघांचा एकत्र फोटो घेण्यासाठी आम्ही ७-८ फोटो तरी काढले. एकही मनासारखा आला नाही. शेवटी त्यातल्या त्यात जो बरा होता तो अपलोड केला.  
  गडावरून मुळशी धरण

क दीड तासांनी गडावर पोहोचलो. गडावर फिरायला १५-२० मिनिटे पुरतात. गडावर अवशेष असे काहीच नाहीत.  एक लहानसे तळे , एक मूर्ती आणि हिरवीगार लहान लहान झुडपं. पण अतिशय स्वच्छ आणि सुंदर परिसर. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर समोर दिसणारे दृश्य तर निव्वळ अप्रतिमच. मुळशी धरण, धरणाची भिंत , समोरच्या डोंगरावरून कोसळणारे धबधबे, ढगात हरवलेले डोंगर अप्रतिमच. मुळशी-ताम्हिणी परिसर पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतो. त्यात कैलासगड म्हणजे हिरवाईचा कळस.  पांढराशुभ्र कैलासपर्वत नाही का होईना पण हा हिरव्यागार कैलासगडाला मात्र जरूर भेट द्या ..   
 
काही छायाचित्रे ...
 
 कैलासगड

माझा रुबाब वेगळाच ...
 
आदित्य , योगेश आणि चेतन 
ताम्हिणी 


उपयुक्त माहिती:

रस्ते:
*  पुणे-पौड-मुळशी-ताम्हिणी-पिंपरी-वडुस्ते-वाघवाडी-कैलासगड 


आसपासचा परिसर:
* ताम्हिणी, घनगड, मुळशी  


---BinaryBandya™  

५ टिप्पण्या: