ताम्हिणी घाटात कितीही वेळा गेले तर मनच भरत नाही.
ताम्हिणी घाटात कुठल्याही ऋतूमध्ये जा त्याची सुंदरता जराही कमी होत नाही.
पण हो पावसाळ्यात ताम्हीणीचे सौंदर्य जरा नाही फारच जास्त खुलते.
ताम्हिणी घाट परिसरात अजून एक सुंदर ठिकाण आहे - पिंपरी व्ह्याली आणि पिंपरी तलाव .
जरा कमी गर्दीचे आणि सुंदर असे ठिकाण. लहान मोठे धबधबे, भरपूर झाडी , धुक्यात हरवलेले डोंगर अन रस्ते . आणि गडबड गोंधळ नसलेला शांत परिसर. अतिशय सुंदर .
स्वर्गाचे प्रवेशद्वार |
ताम्हिणी गाव ओलांडले की ३-४ किमी वर उजव्या हाताला लोणावळा फाटा लागतो.
फाट्यावरून उजवीकडे वळला की धुक्यात हरवत चाललेला एक लहानसा डांबरी रस्ता तुमची स्वागत करतो. नंतर हाच रस्ता धुक्याबरोबर झाडीतही वळणे घेत हरवत जातो. हा रस्ता किती सुंदर आहे म्हणून सांगू , स्वर्गाचे प्रवेशद्वार म्हटल्यावर त्याने सुंदर असायलाच हवे, नाही का ?
रस्त्यावर मधेच दिसतो एखादा गुराखी धुक्यातून वाट काढत चाललेला. तो आमच्या सारख्या हौशी छायाचित्रकारांसाठी अल्बममधे जपता येईल असा एक सुंदर फोटो देऊन जातो.
फाट्यापासून फक्त २ किमी आहे पिंपरी. पिंपरीच्या अगोदरच रस्त्यात डाव्या हाताला लागेल एक सुंदर दरी. ह्या दरीतून कोकणातून घाटावर येणारे ढग वर येतात. अतिशय सुंदर नजरा असतो - जिकडे लक्ष जाईल तिकडे हिरवाईने नटलेले डोंगर, डोंगराभोवती घुटमळणारे ढग आणि डोंगरांच्या अंगा-खांद्यावरून कोसळणारे धबधबे.
कितीही फोटो काढा मन भरणारच नाही ... |
इथून निघून जरा पुढे गेला की लागतो एक सुंदर तलाव. लहान आहे तलाव त्यामुळे लगेच भरतो आणि त्याच्या भिंतीवरून पाणी खाली वाहायला लागते. फार सुंदर नजरा असतो. इथे भुट्टा,भेळ,भजी असलं काहीही मिळत नाही. एकदम स्वच्छ आणि सुंदर परिसर.
हे झाड तर कुठलाही ऋतू असुद्या कधीच बहरत नाही, मला तरी कधी तसे दिसले नाही.
पावसाळ्यात पण हा सजत नाही की काय ? कदाचित बिचाऱ्याचे सजणेच आपल्याला समजत नसावे...
काही छायाचित्रे:
![]() |
खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकत इथे मी तासन-तास बसून राहू शकतो. |
हाच तो तलाव आहे की नाही सुंदर !!! |
भिरा |
उपयुक्त माहिती:
रस्ते:
* पुणे-पौड-मुळशी-ताम्हिणी-पिंपरी
* ह्याच रस्त्याने पुढे लोणावळ्याला जाता येते (पिंपरी - भांबर्डे - कोराईगड -लोणावळा )