बुधवार, २१ जुलै, २०१०

राजगड

२-३ वेळा राजगड ला जाऊनही बालेकिल्याला भेट द्यायचे राहिलेच होते. कधी सुवेळा माची कधी संजीवनी माची पण बालेकिल्ला मात्र प्रत्येकवेळी चकमाच देत होता . एकदा तर आमच्या पैकी फार शेवाळ होते म्हणून परत आलो होतो. ह्यावेळी मात्र फक्त बालेकिल्लाच सर करायचा एवढेच ठरवून राजगड चढायला सुरुवात केली होती .

नेहमीच ट्रेक ठरवण्यासाठी आम्ही सगळे mail mail खेळतो .15-20 mail नंतर माहित नसलेल्या , जाऊन आलेल्या सगळ्या गडांची नावांचा काथ्याकुट झाल्यावर कुठे राजगड बालेकिल्ला final झाला होता ...

नेहमीप्र

माणे सकाळी ६ चा प्लान होता पण पण ..आमच्या मावळ्यांची साखर झोप मीच मोडली. कुणी आंघोळ केलीच नाही फक्त तुळसच लावून आले . एक एक cutting चहा मारला आन पकडला रस्ता राजगडचा वडगाव जवळ अजून एक मावळा योगेश्वर आम्हाला जॉईन झाला. (त्याला आम्ही फील मास्तर म्हणतो, प्रत्येक गोष्टीत ह्याला फीलाच आला पाहिजे मग तो चहा असुदे , जेवण असुदे वा अगदी तुळस लावायची असेल तरीही फील महत्वाचा ... )

वातावरण एकदम पावसाळी अजिबात नव्हते , पावसाळा अन उन्हाळा ह्यांच्या मधेच असल्यासारखे .
उन्हाळा जायला तयार नाही अन पावसाळ्याला कधी येतोय असे झालेय असे काहीतरी.आम्ही मनोमन प्रार्थना करत होतो की पाउस यावा . कात्रज घाटानंतर थोडीशी पेटपूजा केली. राजगडावर खाण्याची सोय नसल्याने एकतर जेवण सोबत घेऊन जावे किंवा खालीच भरपूर खाऊन घ्यावे. कारण चढताना देखील रस्त्यात लिंबू सरबत, ताक असे काही मिळत नाही.त्यामुळे आम्ही २-२ पोहे आणि चहा कॉफी घेतलं. ताजं तवानं होऊन मग आम्ही नसरापूर च्या दिशेने मार्गस्थ झालो. तिथे केळी, लिंबू (सरबतासाठी) आणि पाणी घेऊन पुढे निघालो.

जाताना पूर्ण रस्त्यात राजगडाच दर्शनच झालं नाही. उंच उंच जाऊन ढगांच्या कुशीत तो गाढ झोपला होता. आणि तिकडूनच आमची गम्मत पण बघत होता.पूर्ण रस्त्यात जाताना जुन्या ट्रीप आठवत होत्या. सगळ्या ट्रीप मध्ये काढलेले, ते सगळे जुने स्पॉट आठवत होते. पण या वेळेस इरादा पक्का होता. बालेकिल्ला सर करायचाच. त्यामुळे कुठेही न थांबता आम्ही सरळ राजगडाच्या पायथ्याला पोहोचलो.

उन आता हळू हळू तापायला लागल होतं. म्हणून लगेच चढायला सुरुवात केली. पण ५ मिनिटातच रस्त्यात जांभळाची झाडे दिसली. मग काय, आधी पोटोबा या नियमानुसार मनसोक्तपणे जांभूळ खायचे असा ठरलं.
पण सगळं इतका सोप्पं नसत. जीन्स च्या pant घातलेल्या असल्यामुळे कोणालाच वर चढता येईना. मी तर अभ्याच्या खांद्यावर उभा राहून जांभूळ तोडायचा प्रयत्न केला. पण अफसोस. शेवटी गपचूप खाली पडलेले जांभूळ खाल्ले आणि लगेच निघालो. (कदाचित राजगड पण आमची वाट बघत असावा म्हणूनच आम्हाला लगेच निघावं लागल.)
राजगड चा रस्ता उन्हाळ्यात फारच भकास वाटतो. कारण आजूबाजूला झाडी तशी कमी आहे. आणि शेत जास्त आहेत. त्यामुळे सगळेच ओसाड दिसते. पण पावसाळ्यात हेच दृश्य एकदम वेगळेच असते. सगळी झाडे हिरवीगार झालेली असतात. शेत हिरवे असते. डोंगर हिरवा झालेला असतो. जरी उन्हाळा असला तरी थोडा गड चढून गेल्यावर जो गार वारा येतो त्याची मजा काही वेगळीच आहे. या वेळेस ध्येय्य ठरलेला असल्यामुळे रस्त्यात थांबे पण कमी घेतले. पण एक गोष्ट मात्र बदलली नव्हती. ती म्हणजे आमचे फोटो. (अभ्या चा कॅमेरा सोम्याने पळवला होता. त्यामुळे मोबाईल च्या कॅमेऱ्याने फोटो काढत होतो.) थोडे कमी काढले पण काढले.
सगळ्यांचाच राजगड २ वेळा झाला होता त्यामुळे रस्ता लगेच लक्षात येत होता.

२ तासात आम्ही राजगडाच्या मंदिराजवळ पोहोचलो. तिथे एक पाण्याच टाकं आहे. तिथे पाणी थंड असते. पण या वेळेस आम्ही गेलो तेव्हा टाक्याची अवस्था फारच दयनीय होती. आजींना पाण्यासाठी विचारले असता, "तळ्यातालेच पाणी प्या." असे सांगितले. तळ्यापाशी गेलो तर पाण्याचा रंग पाहून सगळ्यांच्या तोंडाचा रंगच उडाला. पण ईलाज नव्हता. सोबत असलेल पाणी रस्त्यात कुठे उडून गेल कळल पण नाही. आणि रूम वरून जोशमध्ये निघताना भरून ठेवलेल्या बाटल्या आम्ही रूमवरच विसरून आलो होतो. हे पण आम्हाला गडावर गेल्यावर आठवल कि 'आपण बाटल्या भरून ठेवल्या होत्या'.
तिथे मग जेवायची order देऊन आम्ही मंदिराच्या मागच्या भिंतीवरून तोरणा बघत होतो. तोरणा काही आम्हाला नवीन नव्हता. किंवा त्याचा रस्ता पण नवीन नव्हता. पण नवीन होता ते बघण्याच साधन. या वेळेस सोबत योग्याने हरिश्चंद्र गडावर जाताना जी दुर्बीण विकत घेतली होती ती सोबत होती. सिंहगड, तोरणा, आजूबाजूचा परिसर सगळा बघण्यात १ तास निघून गेला.थोड्या वेळाने आजींनी पिठलं, भाकरी, कांदा आणि चटणी आणून दिली. सकाळचे २ प्लेट पोहे तर किती पुरणार? सगळे जन २ दिवस भुकेले असल्यासारखे त्या ८ भाकारयांवर तुटून पडले. पण खरा प्रश्न होता पाण्याचा. प्यायचं काय? पण पर्याय नव्हता. मग तेच तळ्यातल शेवाळयुक्त हिरवागार पाणी नाक आणि डोळे बंद करून पोटात टाकल.







बालेकिल्ला आणि पदामावती माची..






सगळे मावळे परत पुढे जायला तयार झाले. पण सगळे एकत्र आहेत आणि वात न चुकता जातील असा शक्य आहे का?? संजीवनी माचीच्या रस्त्यावरून जात असताना कळल कि बालेकिल्ल्याची वाट वरून जात होती.
पण माघारी जाऊन वर चढण्याचा मूड नव्हता. मग की तिथूनच वर चढायला सुरुवात केली.५०-१०० फुट वर चढलो असेल फक्त, पण आमच्या ढाण्या वाघासाहित सगळेच धापा टाकत होते. (ढेर्या वाढल्यात दुसरं काही नाही)
पण आम्ही इतका वर आलो म्हणून कि काय गड पण आमच्यावर खुश होता. तिथेच एका ठिकाणी दगडातून थेंब थेंब पाणी झिरपत होते. तिथे मनसोक्त पाणी पिऊन बाटलीत भरून घेतले. पाण्याची किंमत कळली तिथे आम्हाला.

मागे सिंहगडावर पाऊस तर जणू त्याला मोठ्या शोवर खाली आंघोळ घालत असल्यासारखा बरसत होतं. पुढच्या १० मिनिटात आम्ही बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर उभे होतो. शब्दात वर्णन करण्यापेक्षा तो दरवाजा तिथे जाऊनच बघावा. तिथे थोडा वेळ विश्रांती घेऊन, मंदिरात दर्शन घेऊन बालेकिल्ल्याच्या बुरुजाजवळ गेलो.तिथे वारा तर 'मी' म्हणत होतं. जणू वादळी वाराच. महाल बघून, थोडे orkut पोस फोटो काढले. तुथून 'रोहीडा' आणि 'रायरेश्वर' चे पठार दुर्बिणीतून पाहता येते.परतीच्या वाटेवर मुख्य दाराजवळ पक्ष्यांचे आवाज ऐकत बसलो. मधेच काही माकडांचे पण आवाज आले आणि आमचा १ मिनिट वाया गेला. आता थोडे ढग जमा झाले होते. आणि बारीक पाउस पण येत होतं. साधारण ५ वाजता उतरायला सुरुवात केली. रस्त्यात एका घरात चहा आणि बिस्कीट घेतले. ७ वाजता पुन्हा गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. हात पाय धुवून, स्वच्छ पाणी पिऊन आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालो.

---सुरेश