गुरुवार, १७ मार्च, २०११

घनगड


धुक्यात हरवलेला घनगड
मागच्या पावसाळ्यात घनगडला गेलो होतो. फार अगोदरपासून तिकडे जायचे मनात होते पण तिकडचा शेवटचा टप्पा जाम अवघड होता. त्या शेवटच्या टप्प्यामुळे राहिलेला घनगड ट्रेक पूर्ण झाला तो तिथल्या ग्रामस्थांनी आणि काही ट्रेकर्सनी लावलेल्या शिडीमुळे. आता तो टप्पा शिडीमुळे बराचसा सुरक्षित झाला आहे आणि तुमच्या-आमच्यासारखे साधे-सुधे ट्रेकर्स पण गडावर जाऊ शकतात .





आम्ही सहाजण पुण्यावरून गेलो होतो. विशाल, माधव, सुरेश, प्रशांत, सुदर्शन आणि हो मी पण. नेहमीचाच ग्रुप. ताम्हिणी म्हटले की सगळेच तयार.
आमची गँग
ताम्हिणी घाट, पिंपरी व्हॅली, प्लस व्हॅली हे आमचे तसे जीवलगच.

ताम्हिणी म्हणजे काय विचारूच नका.  खरेतर ताम्हिणीमध्ये देवाने स्वर्ग बांधायला घेतला होता आणि बांधलाही. फक्त देव राहायला आले नाहीत एवढाच काय तो स्वर्गात आणि ताम्हिणी मध्ये फरक.

  रिमझिम पाउस, धुक्याची दुलई आणि
बुरुजात लपलेला घनगडाचा दरवाजा 
ट्रेकिंग - जगातले सगळ्यात वाईट व्यसन आहे हे !!!  आणि नेमके हेच कॉम्बीनेशन ह्यावेळी जमून आले होते.

गप्पा मारत, जंगलात घुसलो अन जंगलाचा ओळखीचा वास नाकात घुसला. अहा अशा वातावरणात मी/आम्ही तासंतास चालू शकतो. कधी गडावर पोहोचलो ह्याचा पत्ता पण लागला नाही. वाटेत एक लहानसे मंदिर लागले.   कशाचे मंदिर होते बरे, विसरलो. पुढच्यावेळेपासून ह्या
नोंदी ठेवत जाईन.



गड तसा लहानसाच आहे , तासाभरात चढून होतो आणि वरती २० मिनिटात पाहूनही होतो. गडावर फक्त बुरुजांचे अवशेष आहेत बाकी काही नाही.



कोराई गड

पण इकडून तुमची नजर थेट कोकणातच पोहोचते. कोकणात उतरणारे कडे एकदम खासच.कितीही वेळ गडावर बसला तरी कंटाळा नक्कीच येणार नाही. त्या दऱ्या, डोंगर कितीही नजरेत भरून घ्या, मन काही भरणार नाही.  समोर सुधागड,
कोराईगड दिसतात आणि तैलबैला आपल्याच थाटात उभा असलेला दिसतो.




आणि हो गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ उजव्या बाजूला एक मोठीशी शिळा गडाला टेकून  उभी आहे .
किती मोठी आहे बघायची आहे , तर मग हा फोटो बघा .
इथे आतमध्ये काही देव आहेत शेंदूर फासलेले.
आणि छोटीशी गुहा.
मस्त आहे ना?
आणि एक फोटो स्पॉट अजिबात विसरू नये असा, घनगड आणि शेजारच्या डोंगराच्या खोबणीत एक दगडांची उतरंड मांडून ठेवली आहे, माणसांनी नाही काय निसर्गानेच.
एकावर एक कितीतरी स्फटिक रचून ठेवावेत जणू , बारावीच्या भूगोलात अशा दगडांना काय म्हणतात ते होतं पण आता कोणाला आठवणार!

आणि कोणी कृपा करून अजिबात विचारू नका प्रत्येकवेळी अशीच पोज का देतो म्हणून.  


आणि शिडी चढताना जरा जपून, शिडी संपल्यावर डावीकडे वळायचे आहे , तिथे वाट लागते , जरा जपूनच चढा.
हीच ती शिडी , अगोदर इथे फक्त एक दोरी होती ...
                                           
परत येताना ताम्हिणी घाटामध्ये पण छान धुकं होतं. परत येताना घेतलेले काही फोटो.



ताम्हिणी मधले रस्ते 
कुठे आहे घनगड ?
जवळच. पुण्यापासून ८०-९० किमी. ताम्हीनीला जायचे , तिथून लोणावळा रस्ता घ्यायचा आणि भांबर्डे गाव गाठायचे
ह्याच गावातून गडावर जाता येते .
किंवा लोणावळ्यावरून -अ‍ॅंम्बी व्हॅली - भांबर्डे गाव असेही येता येईल.





आम्ही जाऊ शकतो का ?
हो , साधा-सुधा ट्रेक आहे. तुम्हीही जाऊ शकाल. शेवटच्या टप्प्यामध्ये जरा सावधगिरी बाळगा. बस पोहोचलाच.
आणि मदत हवी असेल तर आम्हाला विचारा ना राव ...


---BinaryBandya™


मंगळवार, ८ मार्च, २०११

फूस...

सहज कपाट चाळता चाळता "राजा शिवछत्रपती" पुस्तक हाती लागले. लगेच वाचायला घेतले ..
दहावीच्या सुट्टीत आणि इंजिनीरिंगला असताना हे पुस्तक वाचले होते.  त्यावेळी जमेल तेवढी कल्पनाशक्ती वापरून  गड -किल्ले , रस्ते , गावे डोळ्यासमोर  उभे करत असे .

 
 
 
 
पण आता मात्र गोष्ट वेगळी होती . आता पक्का भटक्या झालोय, नाही म्हटले तरी तीस एक किल्ले अन बराचसा कोकण, पश्चिम महाराष्ट्र फिरून झालाय. बराचसा महाराष्ट्राचा भूगोल समजलाय आता. 
शिवनेरी , जीवधन , राजगड , तोरणा , रायरेश्वर , पन्हाळा , रायगड , सिंहगड - तानाजी कडा , पुरंदर असे एक एक गड पुस्तकातून बाहेर येत होते  अन मी ह्या गडावरून त्या गडावर,  महाराजांचा मावळा बनून महाराजांबरोबरच फिरून येत होतो  (भूगोलासकट).  
खऱ्या -खुऱ्या गडांवर , खऱ्या -खुऱ्या बुरुजांवर .. 
 
 
 
 
मीही राजांबरोबर शिवनेरी ते जीवधन घोड्यावरून एका दमात रपेट मारून येत होतो,
त्या "तानाजी कड्या"वरून तानाजीबरोबरच वर चढून येत होतो .




 
 
अजूनही भरपूर किल्ले बाकी आहेत, बाजीप्रभूंची पावनखिंड पण बाकी आहे, 
प्रतापरावांची नेसरी बाकी आहे.
पण हो मी जाणारच कारण ...

"सह्याद्रीला सवयच आहे शूरवीर वाघांना फूस लावायची..."(इति बाबासाहेब पुरंदरे-राजा शिवछत्रपती) 

आम्हालाही भटकायची सवय म्हणा किंवा फूस म्हणा - सह्याद्री आणि शिवाजी महाराजांनीच लावली ... 


---BinaryBandya™